Animal Care In Summer: आपल्याकडे मकरसंक्रांती पासून तापमान वाढीला सुरवात होत असते. त्यामुळे आपल्याला आपल्या जनावरांची काळजी घेणे गरजेचे असते. कारण आता थंडीचे प्रमाण संपूर्ण राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे साहजिकच उन्हाळ्यामध्ये पशुपालक शेतकऱ्यांची देखील काही प्रमाणात चिंता वाढते. कारण वाढत्या तापमानामध्ये जनावरांच्या बाबतीत देखील अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.(Animal Care: Take care of your animals in this way during summer)
दरम्यान, उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये वाढत्या तापमानात जर जनावरांचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर जनावरांना अनेक प्रकारचे आरोग्य विषयक समस्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे पशुपालकांनी उन्हाळ्याच्या कालावधीत जनावरांची व्यवस्थित काळजी घेणे खूप गरजेचे असते. त्यामुळे आजच्या लेखामध्ये आपण जनावरांची काळजी कशी घ्यावी हे पाहणार आहोत.
Animal Care In Summer: उन्हाळ्यात जनावरांना होऊ शकतात ‘या’ आरोग्य विषयक समस्या
१. उष्माघात:- उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा प्रखर सूर्यकिरणांमुळे आणि पिण्याच्या पाण्याची कमतरता झाल्याने आपल्या जनावरांना उष्माघात होण्याची शक्यता दाट असते. यामध्ये जर दूध देणारी जनावरे असतील तर दूध देण्याचे प्रमाण कमी होते. जर जनावरांना असा प्रकार दिसून आला तर तात्काळ त्यांच्या अंगावर थंड पाणी ओतावे किंवा पोते ओले करून जनावराच्या अंगावर टाकावे.
२. जनावराला कडव्या आजार होऊ शकतो:- उन्हाळ्यामध्ये उन्हाची तीव्रता खूपच असते. जर तुमच्या जनावरांना चांगला निवारा नसेल तर जनावरांच्या कातडीला कडव्या हा कातडीचा आजार होऊ शकतो. यामध्ये ज्या जनावरांचे कातडी पांढरा रंगाची असते त्यांना हा आजार होण्याची शक्यता वाढते. जर कडव्या आजाराची लक्षणे दिसली तर जनावरांना सावलीत बांधावे व भरपूर प्रमाणात थंड पाणी प्यायला द्यावे. तसेच ताबडतोब पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाने योग्य उपचार करावेत.
३. कॅल्शियम कमी होऊ शकते:- उन्हाळ्यामध्ये अनेक भागातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हिरवा चारा आढळत नाही. अशावेळी अनेक शेतकरी जनावरांना ऊसाची वाढे खायला घालतात. हे खाल्ल्यामुळे उसाच्या वाड्यामध्ये असलेली ऑक्सिलेट खनिज आणि जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम एकत्र येते व लघवी वाटे निघून जाते. त्यामुळे जनावरांच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होते. येवढंच नाहीतर जनावरांना मिल्क फीवर नावाचा आजार देखील होण्याची शक्यता असते.
Animal Care In Summer: उन्हाळ्यात अशा पद्धतीने घ्या आपल्या जनावरांची काळजी
- उन्हाळ्यामध्ये जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्याकरिता स्वच्छ व थंड पाणी भरपूर प्रमाणामध्ये प्यायला द्यावे.(किमान दोन ते तीन वेळा)
- ज्या शेतकऱ्यांना शक्य असेल तर गोठ्यामध्ये फॉगरचा वापर करावा.
- गोठ्याची छपरावर नारळाच्या झावड्या किंवा उसाचे पाचट किंवा गवत टाकावे.
- जनावरांना दुपारच्या वेळी बाहेर चरायला न नेता शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी न्यावे.
- वाळलेले गवत तसेच कळबा असेल तर त्यावर मिठ किंवा गुळाचे पाणी शिंपडून मग जनावरांना खायला द्यावे.
- उन्हाळ्यामध्ये चाऱ्याच्या कमतरतेमुळे किंवा उन्हाच्या तडाक्या मुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता असते. अशा वेळी पशु तज्ञांकडून घटसर्प तसेच फऱ्या आणि लाळ्या खुरकूत सारख्या आजारांचे लसीकरण करून घ्यावे.