पिक्चर बिक्चर। दिवाळीच्या मुहूर्तावर ‘टायगर 3’ हा चित्रपट सलमान खान प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. ‘टायगर 3’च्या यशानंतर सलमान आता ‘द बुल’ या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विष्णुवर्धन करत आहेत. एकीकडे सलमान या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे तर दुसरीकडे त्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामध्ये सलमान हा सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया देताना दिसतोय. सलमान खानच्या ‘बिग बॉस 6’मध्ये करीना तिच्या एका आयटम साँगच्या प्रमोशनसाठी आली होती. 2013 मधील ही घटना आहे. त्यावेळी सैफने करीनाशी लग्न केलं होतं.
सैफ अली खान आणि करीनाने 2012 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर ‘दबंग 2’ या चित्रपटातील ‘फेव्हिकॉल से’ या आयटम साँगमध्ये करीना झळकली होती. याच गाण्याच्या प्रमोशनसाठी ती बिग बॉसच्या सेटवर पोहोचली होती. यावेळी सलमानने तिला विचारलं की, “सैफसाठी तुला काही संदेश द्यायचा आहे का?” त्यावर करीना म्हणते, ‘हाय सैफ’. हे ऐकून सलमान हसत करीनाला म्हणतो, “चुकीच्या खानसोबत लग्न केलंस तू.” हे ऐकताच करीनासह उपस्थित प्रेक्षक हसू लागतात.
करीना आणि सैफच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. एका मुलाखतीत करीना या अंतरावर आणि सैफसोबतच्या आंतरधर्मीय लग्नावर मोकळेपणे व्यक्त झाली होती. “लोक आंतरधर्मीय लग्नाच्या विषयावर चर्चा करण्यात खूप वेळ वाया घालवतात. खरंतर ही गोष्ट तेवढी मोठी नाहीच”, असं करीना म्हणाली होती. वयातील दहा वर्षांच्या अंतरावरून ट्रोल करणाऱ्यांनाही करीनाने सडेतोड उत्तर दिलं होतं.
“वयामुळे कधीपासून फरक पडू लागला? तो तर आजही आधीपेक्षा खूप हॉट आहे. मी दहा वर्षांनी लहान आहे, याचा मला आनंद आहे. त्याने चिंता करायला हवी. तो 53 वर्षांचा झाला, असं कोणीच म्हणत नाही. वयातील अंतरामुळे काही फरक पडत नाही. नात्यातील एकमेकांविषयीचा आदर, प्रेम आणि एकमेकांचा सहवास किती एंजॉय करतो ते महत्त्वाचं असतं”, असं करीना म्हणाली होती.