पळसदेव : उजनीतील पळसनाथाचे मंदिर सलग दुसऱ्या वर्षीही झाले उघडे

पळसदेव। उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरणात गेलेल्या गावांच्या गावखुणा उघड्या पडू लागल्या आहेत. गेल्या काही दशकांपासून पाण्याखाली राहूनही पुरातन वास्तू अद्यापही सुस्थितीत असल्याचे आढळून येत आहे. इंदापूर तालुक्‍यातील पळसदेव येथील ग्रामदैवत पळसनाथाचे मंदिर यंदा पूर्णपणे पाण्याबाहेर आले आहे. यामुळे हे मंदिर पाहण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करू लागले आहेत.

मंदिराच्या तटबंदीची काहीशी दुरवस्था झालेली आहे. परंतु, प्राचीन स्थापत्य कलेच्या अचाट सामर्थ्याचे दर्शन घडविणारे हे हेमाडपंती मंदिर अद्यापही लक्षवेधी ठरत आहे. सुमारे दहाव्या शतकातील हे मंदिर काळ्या पाषाणाच्या भव्य शिलांच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. पुनर्वसन होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या गावठाणात ग्रामदैवत पळसनाथाबरोबरच इतर देव-दैवतांची मंदिरे अस्तित्वात होती. गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर येथील मंदिरातून शिवलिंग नवीन गावठाणात बांधलेल्या मंदिरात स्थापन करण्यात आले.

यानंतर मूर्तीविना उरलेली मंदिरे 1976 मध्ये पाण्याखाली गेली. दरवर्षी पळसनाथाच्या मंदिराचे शिखर पूर्णपणे उघडे होत असे. तर ज्या ज्या वर्षी दुष्काळ पडला, त्या वर्षी हे मंदिर पूर्णपणे उघडे झाले होते. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून सहज नजरेस पडणाऱ्या या मंदिराला पाहण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही. इतिहास अभ्यासकांनीही येथे उपस्थिती लावून माहिती घेतल्याचे येथील केशव नगरे, सौरभ नगरे, युवराज नगरे, यांनी सांगितले आहे.

पूर्वी पळसदेव गावाला रत्नपुरी या नावाने ओळखले जात होते. तर, इंदापूर तालुक्‍याला इंद्रपुरी या नावाने ओळखले जात होते. या ठिकाणी नऊस नावाच्या राज्याने 99 यज्ञ केले होते. शंभरावा यज्ञ झाला असता, तर काशीसारखे पवित्र तीर्थस्थान याठिकाणी निर्माण झाले असते. मात्र, या राज्याला इंद्रायणीला प्राप्त करून घेण्याची दुर्बुद्धी सुचली आणि त्याने त्या नादात ऋषी-मुनींना त्रास देण्यास सुरवात केली. त्यामुळे संतापलेल्या ऋषींनी त्या राजाला शाप दिला. शीर मनुष्याचे, तर धड सापाचे, याने शापित झालेला राजा साप होऊन या परिसरात वावरत होता, अशी आख्यायिका सांगितली जाते.

पळसनाथाचे मंदिर चुना आणि भाजलेल्या विटांमधून बांधण्यात आले आहे. पाया पाषाणी शिळांच्या आधारावर उभा आहे. मंदिराचे प्रवेशद्वार पंचशाखीय आहे. यावरती व्याल, पज्ञपत्र, स्तंभशाखा, वेलीशाखा, वाद्यसहित गंधर्व आणि सुरसुंदरी आहेत. विरगळ, भग्ननंदी, भग्नमारुती, दशावतार, शिल्पपट, सतीशिला पाषाणावर कोरलेल्या आहेत. काही अवशेष पडलेल्या अवस्थेत आहेत. तर, येथील शिळांमधून सप्तसूर निघत असल्याचे बोलले जाते. मंदिराच्या पूर्वेकडील बाजूला काशिनाथ आणि विश्वनाथाची दोन मंदिरे आहेत. ती कायम पाण्याखाली असतात. दगडी मंदिरावर कोरलेल्या शिल्पकला अप्रतिम आहेत.

ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *